पांथस्थ
पुरोगामी पथावरून प्रवास...
कॅ. गोपाळ गंगाधर लिमये
( 25 सप्टेंबर 1881 - 19 नोव्हेंबर 1971)
कॅ. गोपाळ गंगाधर लिमये

"किस्मत" या कथेनं मराठी कथेला वेगळं वळण देणारे कॅप्टन गो. गं. लिमये यांनी मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित वैद्यकीय पदवी घेतली होती. वैद्यकीय पदवीनंतर "इंडियन मेडिकल सर्व्हीस" मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. 87 पंजाब बटालियनमधून कॅप्टन म्हणून त्यांनी पहिल्या महायुद्धात मेसोपोटिमिया व बगदाद येथे भाग घेतला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील युद्धात ते लढलेही. ‘‘सैन्यांतील आठवणी’’ या आत्मनिवेदनात्मक पुस्तकात त्यांनी पेशावर, दारेसलाम, बगदाद इत्यादी ठिकाणच्या आठवणी मनोरंजक पद्धतीने सांगितल्या आहेत. त्यांनी 1912पासून लेखनाला सुरूवात करून कथाकार व विनोदकार म्हणून ख्याती मिळवली होती. मराठी कथेला घटनाप्रधान व कल्पनारम्य वातावरणातून वास्तवाकडे वळवण्याचं श्रेय त्यांच्या कथेला जातं. त्यांनी युद्धकथांची मराठी साहित्यात भर घातली. शिवाय विख्यात फ्रेन्च नाटककार मोलियर यांच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासंबंधीही काही लेखन केलं होतं. मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य होते. विठूचे भविष्य , गोपाळकाला , हेलकावे , विनोदबकावली या पुस्तकांतून त्यांनी लघुकथेला जीवनाच्या जवळ नेलं.
कॅप्टन लिमये यांच्या पत्नी आनंदीबाई त्याकाळी बी. ए. झाल्या होत्या. त्यांनीही काही कथालेखन केलं आहे. शकूचा भाऊ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
कॅप्टन लिमये व आनंदीबाई या दोघांचाही दृष्टीकोन नेहमीच पुरोगामी राहिला होता. त्याकाळातील चांगल्या नवेपणाचा त्यांनी नेहमीच स्वीकार केलेला दिसतो.

चिं. स. लाटकर
( 24 फेब्रुवारी 1928 – 7 जानेवारी 2014)
चिं. स. लाटकर

चिं. स. तथा अण्णासाहेब लाटकर यांनी मुद्रणक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. खरं तर ते मुद्रण क्षेत्राकडे सामाजिक चळवळीमुळे वळले होते. अण्णासाहेबांना समाजाप्रती कमालीची आस्था होती. म्हणूनच ते विद्यार्थी दशेपासूनच कम्युनिस्ट चळवळीकडे ओढले गेले होते. अण्णासाहेब लाल निशाण गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करण्यासाठी त्याकाळी हॅंडबिलं, छोट्या पुस्तिका प्रसिद्ध केली जात. अण्णासाहेबांचा मुद्रण क्षेत्राशी पहिला संबंध आला तो यातूनच. काम कोणतंही असो, अतिशय तळमळीनं ते करायचं हा अण्णासाहेबांचा स्वभाव होता. मुद्रणसौंदर्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ते मुद्रण क्षेत्रात उतरल्यावर त्यांनी आपल्या तळमळीनं ग्रंथांना देखणं केलं. त्यांनी केलेली छपाईही हटके, लक्षात राहणारी असायची. त्यामुळेच त्यांच्या कल्पना मुद्रणालयाचा ठसा उमटला. उच्च दर्जाचे मुद्रण कलाकार असलेल्या अण्णासाहेबांनी अतिशय स्वच्छ छपाई, देखणं अक्षरवळण अन् सुंदर मांडणी या ताकदीवर 1974 ते 1984 या दहा वर्षात सलग उत्कृष्ट मुद्रणाबद्दलचा राष्ट्रपती पुरस्कार मिळवला. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर स्वतःला बदलत नेणारा कलावंत म्हणून अण्णासाहेबांकडे पाहावं लागेल. संगणकाचं युग सुरू होताच, त्यांनी डॉ. कूपर यांच्या समवेत डिजिटल स्वरूपात आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण फॉन्ट तयार करवून घेतला. त्यांच्या या कार्यामुळे परभणी येथे 1995मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला. या सर्व काळात त्यांचा सामाजिक बांधिलकीचा बंध आणि पुरोगामी दृष्टी कायम होती. त्यामुळेच त्यांनी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या स्थापनेनंतर प्रारंभीच्या काळात आपल्या अनुभवाचा लाभ घेऊ दिला. राज्य सरकारच्या किमान वेतन कायदा निर्मिती समितीत सदस्य म्हणून काम केलं. 1977 नंतरच्या काळात आदर्श शिक्षण मंडळी ही संस्था व अभिनव विद्यालय ही शाळा नावारुपास आणण्यात मोलाचा वाटा उचलला.

डॉ. शकुंतला लाटकर
(25 ऑगस्ट 1925 - 22 ऑक्टोबर 2012)
डॉ. शकुंतला लाटकर

आदर्श शिक्षण मंडळीच्या बी. एड्. कॉलेजच्या प्राचार्या व लेखिका म्हणून डॉ. शकुंतला लाटकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. मराठीतील प्रसिद्ध कथाकार कॅप्टन गो. गं. लिमये यांच्या त्या कन्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहल्यादेवी मुलींच्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. या शाळेच्या पहिल्या तुकडीतील त्या विद्यार्थिनी होत. ही पहिली तुकडी 1942मध्ये मॅट्रिकच्या (अकरावी) परीक्षेला बसली होती. मुंबई, गुजरात व कर्नाटक अशा तीन प्रदेशांची मिळून ही परीक्षा होत असे. या परीक्षेत मुलींमध्ये पहिली येऊन शकुंतलाबाईंनी "चॅटफिल्ड प्राईज" व "जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती" मिऴवली होती. तसंच, संस्कृतमध्ये 97 टक्के गुण मिळवत "परमानंद प्राईज" पटकावलं होतं. पहिल्या तुकडीतील शकुंतलाबाईंच्या या यशामुळं अहल्यादेवी शाळा "मुंबई प्रेसिडेन्सी"मध्ये प्रसिद्ध झाली होती. शाळेत व महाविद्यालयात असतानाच शकुंतलाबाई मराठी व इंग्रजी भाषेतील उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्धीस आल्या होत्या. त्यांनी गाजलेली "रानडे वक्तृत्व स्पर्धा" जिंकली होती. एम. ए., बी. एड्., एम. एड्. केल्यानंतर त्यांनी पीएच्. डी. पदवी संपादन केली. "सायंटिफिक व्होकॅब्यूलरी" या विषयावर त्यांनी सादर केलेला प्रबंध 1976 ते 1980 या पाच वर्षांच्या काळातील विद्यापीठातील सर्वोत्तम प्रबंध ठरला. त्यासाठी त्यांना "मेनन पारितोषिक" मिळालं. आदर्श शिक्षण मंडळीच्या बी. एड्. कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून त्या 1972 मध्ये रुजू झाल्या आणि प्राचार्या म्हणून तिथून 1984मध्ये निवृत्त झाल्या. त्यांच्या कार्यकाळात बी. एड्., एम. एड्. व डी. एच. ई. या तीनही परीक्षेत त्यांचे विद्यार्थी विद्यापीठात गुणवत्ता यादीत चमकले. शकुंतलाबाईंनी वडिलांकडून लेखनगुणही घेतले होते. "दूरदर्शन"वर प्रचंड लोकप्रिय झालेल्या "महाभारत" या मालिकेच्या 93 भागांचा त्यांनी मराठीमध्ये केलेला अनुवाद चार खंडात पुस्तक रुपानं प्रसिद्ध झाला आहे. अशोक कुमार यांच्या चरित्रग्रंथाचा व मनेका गांधी यांच्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला.

उल्हास लाटकर
उल्हास लाटकर

वडील चिं. स. लाटकर यांच्याकडून मुद्रणकलेविषयीची सौंदर्यदृष्टी व सामाजिक बांधिलकी आणि आई शकुंतलाबाई यांच्याकडून शिक्षण क्षेत्राविषयीची आस्था घेऊन उल्हास लाटकर हे प्रकाशन क्षेत्रात आले. उल्हास लाटकर हे मूळचे इंजिनिअर. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळवताना ते पुणे विद्यापाठात नववे आले होते. उज्ज्वल अशी शैक्षणिक कारकीर्द असल्यानं अभियांत्रिकीची पदवी मिळताच त्यांची बजाज ऑटोमध्ये निवड झाली. काही काळ त्यांनी तिथे नोकरीही केली. पण ग्रंथांची हाक त्यांना अस्वस्थ करीत होती. आई-वडिलांकडून मिळालेला वारसा त्यांना पुन्हा पुन्हा ग्रंथजगताकडे ओढत होता. त्यामुळे ते आधी ग्रंथमुद्रणाकडे वळले आणि नंतर प्रकाशन क्षेत्राकडे. आजोबा कॅप्टन गो. गं. लिमये व आजी आनंदीबाई यांच्याकडून मिळालेला पुरोगामित्वाचा वारसा आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या दृष्टीबरोबरच अभियांत्रिकीच्या शिक्षणानं प्राप्त झालेल्या शास्त्रीय व गणितीय दृष्टिकोनामुळे अमेय प्रकाशनाला मराठी प्रकाशन क्षेत्रात एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्यात उल्हास लाटकर यांनी यश मिळवलं.

अमेय प्रकाशनाविषयी...

अमेय प्रकाशन म्हणजे लालित्यपूर्ण, तरीही वेगळा विचार देणारी पुस्तकं. वैचारिक, तरीही साहित्यगुण जपणारी पुस्तकं. आरोग्यशास्त्र समजावणारी, तरीही हलकीफुलकी मांडणी करणारी पुस्तकं. अमेय प्रकाशनाची पुस्तकं म्हणजे युवकांना नेतृत्वासाठी आवाहन करणारी अन्‌ प्रेरणा देणारी पुस्तकं. समाजातील उगवत्या पिढीच्या सर्वंकष शिक्षणाविषयी आस्था बाळगणाऱ्या, विविध क्षेत्रातील नेतृत्त्वगुण वाढीस लागावे यासाठी प्रेरणा देणाऱ्या व सामाजिक भान जपणाऱ्या पुस्तकांची निर्मिती हे अमेय प्रकाशनाचं वैशिष्ट्य आहे. 
अमेय प्रकाशनाची वाटचाल सुरू झाली 1993मध्ये. पुरोगामी वारशाची त्रिधारा अभिमानानं सांगत ही वाटचाल सुरू झाली. राष्ट्रीय स्तरावर मुद्रणतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले आणि सामाजिक भान असणारे चिं. स. तथा अण्णासाहेब लाटकर यांच्याकडून मुद्रणसौंदर्याची नजर आणि सामाजिक भान हा वारसा "अमेय"ला मिळाला. मराठी कथेचे एक शिल्पकार कॅप्टन गो. गं. लिमये यांच्याकडून वाङ्‌मयीन गुणांचा व आरोग्यस्वास्थ्यविषयक लेखनाचा वारसा "अमेय"नं घेतला आहे. शकुंतलाबाई लाटकर यांच्याकडून शिक्षणविषयक आस्थेचा वारसा "अमेय"ला मिळाला आहे. कॅप्टन लिमये, अण्णासाहेब लाटकर व शकुंतलाबाई हे तिघंही पुरोगामी पथावरून चालत राहिलेले दिसतात. नव्याचा, आधुनिकतेचा ध्यास तिघांनाही होता. आपापल्या क्षेत्रात तिघांचेही नेतृत्वगुण प्रकट झालेले दिसतात. त्यांच्या या पुरोगामी पथावरच्या प्रवासाचा वारसा अभिमानानं सांगत, त्याच्याकडून प्रेरणा घेत आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणाला अभिवादन करीत "अमेय प्रकाशन"ची यशस्वी वाटचाल सुरू आहे.  ग्रंथांविषयीच्या रक्तात असलेल्या ओढीनं उल्हास लाटकर यांना प्रकाशन व्यवसायाकडे खेचून आणलं. एक मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून उत्तम असलेली शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द सोडून उल्हास लाटकर ग्रंथनिर्मितीकडे वळले. त्यांनी वडिलांच्या, चिं. स. लाटकर यांच्या, मार्गदर्शनाखाली ग्रंथमुद्रणाच्या क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. त्याचकाळात ग्रंथमुद्रण क्षेत्रात काही आमूलाग्र बदल होत होते. तोवर मुद्रणाचं काम एकाच छताखाली चालत असे. मुद्रकाचं प्रत्येक कामावर नियंत्रण असे. एक कला म्हणून ग्रंथनिर्मिती करता येत असे. आता यात मोठे बदल सुरू झाले होते. आधुनिक यंत्रसामग्रीबरोबरच प्रत्येक कामाची विभागणी सुरू झाली. अक्षरजुळणी, प्लेट, छपाई, बांधणी हे प्रत्येक काम वेगवेगळ्या ठिकाणी करून घेणं सुरू झालं. कुणा एकाचं नियंत्रण या कामावर राहिलं नाही. साहजिकच या कामातील आव्हान संपलं. अण्णासाहेबांना या बदलांमुळे होणाऱ्या परिणामांची लगेचच जाणीव झाली होती. त्यांनी उल्हास लाटकर यांच्यातील ऊर्मी ओळखून ग्रंथमुद्रणाकडून ग्रंथ प्रकाशनाकडे वळण्याचा सल्ला दिला. "अमेय प्रकाशना"च्या स्थापनेची प्रेरणा अण्णासाहेबांची आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 1 मे 1993 रोजी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभ मुहुर्तावर "अमेय प्रकाशन" सुरू झाले. 
त्यावेळच्या प्रचलित प्रकाशन संस्थांपेक्षा वेगळी वाट धरायची व नवी आव्हानं स्वीकारायची हे पक्कं होतं. "शिक्षक हस्तपुस्तिका" हे प्रथमदर्शनी आतबट्ट्याचा व्यवहार वाटावं असं पुस्तक प्रकाशित करण्याचं धाडस करून या प्रकाशन संस्थेची सुरूवात झाली आहे. शिक्षक हस्तपुस्तिका ही तोवर राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची व माध्यमिक शिक्षण मंडळाची मक्तेदारी होती. याला आव्हान देण्याचं धाडस करीत प्रकाशन क्षेत्रात "अमेय"नं पहिलं पाऊल टाकलं. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांच्या गरजा ओळखून पहिली ते दहावी या वर्गांसाठी उपयुक्त ठरतील अशा शिक्षक हस्तपुस्तिका संचाची निर्मिती करण्यात आली. या पहिल्याच प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर, मुख्याध्यापक डायरी, शिक्षक डायरी, लिपिकाची डायरी, शाळांचं व्यवस्थापन अशा कित्येक शालोपयोगी पुस्तकांचं प्रकाशन "अमेय"कडून यशस्वीरीत्या करण्यात आलं. 
विविध क्षेत्रातील युवक-युवतींमधील नेतृत्त्वगुण वाढीस लागण्याच्या दृष्टीनं प्रेरणा देणाऱ्या ग्रंथनिर्मितीकडे "अमेय"नं लक्ष वळवलं. याबरोबरच विषयांचं वैविध्य व विविध स्तरांवरचा विस्तार यामुळे "अमेय प्रकाशन"चा ठसा उमटू लागला. 

प्रकाशन समारंभ : एक इव्हेंट
कोणत्याही लेखकाला त्याचं पुस्तक वाचकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचावं, असंच वाटतं. आपला लेखक आणि त्याचं पुस्तक अगदी वाजतगाजत वाचकांपर्यंत नेण्याची ‘अमेय प्रकाशना'ची पद्‌धती आहे. कोणत्याही पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ‘अमेय'साठी एक ‘इव्हेंट' असतो. ‘अमेय'ची पताका राष्ट्रपती भवनापासून अमेरिकेत व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली आहे. भारताच्या सीमेवर ‘अमेय'च्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे आणि सीमेपल्याड फ्रॅंकफूर्ट, जेरुसलेम येथेही मोठ्या धामधुमीत प्रकाशन समारंभ झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि संसदेच्या अॅनेक्‍सी हॉलमध्येही पुस्तक प्रकाशनाचा इव्हेंट झाला आहे. 
‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने ‘अमेय'च्या पुस्तक प्रकाशन समारंभाची दखल दोन वेळा घेतली आहे. एकाच लेखकाच्या बावीस खंडांचं एकावेळी प्रकाशन हा राष्ट्रीय विक्रम ‘अमेय'च्या नावावर नोंदवला गेला आहे. कै. काकासाहेब गाडगीळ यांचं साहित्य ‘समग्र काका' या बावीस खंडांतून ‘अमेय'नं प्रकाशित केलं आहे. तसंच, वीणा पाटील यांच्या ‘प्रवास जगाचा... जगण्याचा' या पुस्तकाचं प्रकाशन 33 हजार फूट उंचीवर आकाशात करण्यात आलं. विमान प्रवासात पुस्तक प्रकाशन ही गोष्ट भारतीय भाषांमध्ये तरी प्रथमच घडली होती. या दोन्ही ‘इव्हेंट'ची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने नोंद केली आहे. 
पुस्तकाचं देखणेपण ही ‘अमेय'चा खासीयत आहे. पुस्तक आशयदृष्टया समृद्ध असावं हे पाहतानाच ते सुबक सुंदर दिसावं, याचीही काळजी घेतली जाते. त्यामुळेच ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स' या प्रकाशकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘एक्‍सलन्स इन बुक प्रॉडक्‍शन' या पुरस्काराचा मान ‘अमेय'च्या अनेक पुस्तकांना मिळाला आहे.